हैद्राबाद : आंध्र प्रदेशच्या अँटी करप्शन ब्यूरोने तिरुमला तिरुपती देवस्थानम चे डेप्यूटी ईओ मेंडू लोकनाधम यांच्याविरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाच्या चौकशीनंतर आणि आरोपपत्र दाखल झाल्यानंतर सीबीआयने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयने टीटीडीच्या काही कर्मचार्यांच्या मालमत्तेबाबत एसीबीला माहिती दिली होती. तिरुपतीमधील चार ठिकाणी घेतलेल्या झडतीदरम्यान २ किलो सोनं, ६.५ किलो चांदी, १२.५ लाख रुपये रोख, चार फिक्स्ड डिपॉझिट आणि संपत्तीची कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत तब्बल ५ कोटी असल्याचं एसीबीने सांगितलं.
घर आणि कार्यालयावर छापा
अँटी करप्शन ब्यूरोने बुधवारी तिरुपतीमध्ये टीटीडीचे उप-कार्यकारी अधिकारी मेंडू लोकनाधम यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले. एसीबीच्या अधिकार्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित ठिकाणांवरही एकाच वेळी झडती घेतली. एसीबीचे डीएसपी श्रीनिवास राव यांच्या नेतृत्वाखालील सात पथकांनी बुधवारी सकाळी सहा वाजता ही कारवाई सुरू केली. अधिकारी तपासासाठी पोहोचले तेव्हा लोकनाधम घरीच उपस्थित होते.
टीटीडीमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम
लोकनाधम सध्या श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात मंदिर डेप्यूटी ) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी टीटीडीमध्ये विविध पदांवर काम केलं आहे. २०१६ मध्ये एसीबीने टी. भूपती रेड्डी यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यावेळी तिरुपती आणि बंगळुरू येथील त्यांच्या नातेवाईकांवर आणि जवळच्या सहकार्यांच्या घरावर एकाच वेळी छापे मारण्यात आले होते. उत्पन्नाच्या सोर्सपेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याच्या आरोपावरून हे छापे टाकण्यात आले होते.